पूरबाधित शाळांना सीमेन्स युनियन व ऐक्य ट्रस्टचा मदतीचा हात

माझं गाव माझं शहर | परंडा (दि. ४ मे) : परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीमेन्स वर्कर्स युनियन आणि सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने सहा शाळांना लाखो रुपयांचे शालेय साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले.

आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत आवार पिंपरी, वागेगव्हाण, कपिलापुरी, देवगाव (खुर्द), देऊळगाव आणि कारंजा येथील शाळांना विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये मुलींसाठी शौचालये, पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या व स्टँड, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर्स, स्टील टाक्या, इलेक्ट्रिकल इनव्हर्टर, सतरंज्या, सीलिंग फॅन्स, २० लिटर वॉटर थर्मास फ्लास्क तसेच प्रयोगशाळा साहित्याचा समावेश आहे.

कार्यक्रमास सीमेन्स ऐक्य ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राणे, विश्वस्त तथा सीमेन्स क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी मनोज मोहिते, सीमेन्स वर्कर्स युनियनचे छत्रपती संभाजीनगर शाखा सेक्रेटरी दत्तू भंडे, माजी कौन्सिल मेंबर प्रकाश जाधव, तसेच माजी चेअरमन विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, शालेय समिती अध्यक्ष राजकुमार नरुटे, उपाध्यक्ष धनश्री गुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक राणे आणि दत्तू भंडे यांनी सांगितले की, कामगारांच्या मासिक वर्गणीतून हा निधी उभारला जात असून, देशभरात विशेषतः ग्रामीण भागात अशा विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मदत मिळालेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आवार पिंपरीचे शहाजी घावटे, वागेगव्हाणचे शिवाजी शिंदे, कपिलापुरीचे शिवाजी पंडित, देवगाव (खुर्द) चे बाबासाहेब शिंदे, देऊळगावचे सचिन सूर्यवंशी आणि कारंजाचे आण्णा कोळी यांनी सीमेन्स युनियन व ट्रस्टला आभारपत्र देऊन गौरव केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांतील शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.

error: Content is protected !!