📰 माझं गाव माझं शहर | परंडा, दि. २ मे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात स्व-जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून परंडा शहरात या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः नोंदणी करून केला.
१ मेपासून राज्यभर स्व-जनगणना मोहीम सुरू झाली आहे. दिवे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची जनगणना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
परंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनीषा वेडेळी यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अचूक माहिती भरावी. स्व-जनगणनेची माहिती नागरिकांनी स्वतः भरायची असल्याने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी ठरणार आहे.
परंडा शहरात सुमारे पाच हजारांहून अधिक घरे असून या प्रक्रियेसाठी सहा पर्यवेक्षक आणि ३५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ मेपर्यंत स्व-जनगणना पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत अधिकारी घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत.
नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी नागरिकांना आवाहन केले की, जनगणना ही शासनाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी व्हावे. नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती न देता अचूक आणि सत्य माहिती नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परंडा शहरातील जनगणना उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून शहराच्या विकासाला अधिक अचूक दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
