राजकिय- बार्शीत दोन अण्णा, दोन नानांसह मालकांचेही स्वप्न भंगले..!

बार्शी (माझं गांव माझं शहर) राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत आज जाहीर झाल्या असून बार्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देण्यात आलं आहे. त्यामुळे, गेल्या 4 वर्षांपासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या बार्शीतील दोन अण्णा आणि दोन नाना, आणि मालकांचेही स्वप्न भंगले. आता, महिलासाठी नगराध्यक्षपद आरक्षित पडल्याने उमेदवार कोण? असा प्रश्न अण्णा, नाना आणि मालकांच्याही मनात आहे.

शहराचा गाडा हाकण्यास बार्शीच्या ‘नगराध्यक्ष’पदासाठी माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले आणि माजी नगरसेवक विजय राऊत अग्रेसर होते. मात्र, आरक्षण सोडत जाहीर झाल्याने या दोन नानांचे स्वप्न भंगले आहे. तसेच, महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक, गटनेते नागेश अक्कलकोटे आणि महायुतीकडून माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचेही नाव चर्चेत होते, म्हणजेच दोन अण्णा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण, आरक्षण सोडतीनुसार आता अण्णा आणि नानांना स्वतः उमेदवार होता येत नाही. तरी आपल्याच घरातील महिला उमेदवार असावा यासाठी ही नेतेमंडळी प्रयत्नशील असेल. त्यामुळे, कोणत्या ताईंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे पाहावे लागेल.

दरम्यान, माजी नगरसेवक प्रशांत कथले यांचेही नाव नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे होते, पण आता त्यांनाही माघार घ्यावी लागणार असून त्यांच्याकडूनही कुटुंबातील महिला सदस्यांचे नाव समोर येत आहे. त्यातूनच, आता या सर्वांची स्वप्नपूर्ती होईल. त्यामुळे, मविआचे प्रमुख आमदार दिलीप सोपल, विश्वास बारबोले आणि महायुतीचे प्रमुख माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून उमेदवार म्हणून कोणाचे नाव अंतिम होईल हे दिवाळीनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे, दिवाळीचा फराळ करताना तिखट गोड चर्चा करायला मोठा विषय मिळालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

error: Content is protected !!