परंडा (प्रतिनिधी) – परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ निमित्त जयंती उत्सव समिती गठनासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास जाधव, उपाध्यक्षपदी नवनाथ गावडे तर सचिवपदी किरण बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक ज्येष्ठ नेते मोहनदादा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नवीन समितीचा कार्यकाळ दि. ११ एप्रिल २०२६ ते दि. ०५ एप्रिल २०२७ असा निश्चित करण्यात आला असून, या कालावधीत महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन तसेच नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे, फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक डॉ. अनंत देडगे, तालुका अध्यक्ष संतोष हिवरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, तालुका महासचिव राहुल पवार, उपाध्यक्ष शहाजी सोलनकर, शहराध्यक्ष किरण बनसोडे तसेच इरशाद बागवान आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.