परंडा, दि. २ (तानाजी घोडके) – भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच धाराशिव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते तथा माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी श्री. ठाकूर यांनी फेटा बांधून, शाल व पुष्पहार देऊन श्री. कोकणे यांचा सत्कार करत अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस श्री. धनाजी गायकवाड, परंडा शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, शिवाजीराव पाटील, सोशल मिडिया तालुका संयोजक श्री. तुषार नेटके, श्री. सनी अहिरे, श्री. नागेश मिसाळ तसेच खामसवाडी येथील भाजपा नेते श्री. अनिल शेळके, श्री. सादिक सय्यद, श्री. राजेश गरड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. विश्वास कोकणे यांनी पक्षाने कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी देत थेट सभापतीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. जनतेशी असलेला सततचा संपर्क, प्रामाणिक कार्यशैली आणि स्वच्छ प्रतिमा यामुळेच आपण जिल्हा परिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झालो, असे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी समाजकल्याण समितीच्या माध्यमातून लोकाभिमुख व पारदर्शी कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजकल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्याशी विविध विकासात्मक व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कोकणे यांनीही श्री. ठाकूर यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आदर व्यक्त केला.
