परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माझ्यासह भाजपा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, भाजपा नेते गौतम लटके, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, वर्गाचे जिल्हा संयोजक दत्ता राजमाने, शिवाजीराव गिड्डे पाटील, सचिन घोडके, जयदेवबप्पा गोफणे, अनिल पाटील, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
वर्गाच्या उद्घाटनानंतर वंदेमातरम, महाराष्ट्र गीत व वर्ग गीत झाले. पहिल्या सत्रात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा इतिहास, विचारधारा व वाटचाल’ हा विषय अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मांडला. सत्र अध्यक्ष मा. जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे होते.तर दुसऱ्या सत्रात सचिन घोडके यांनी भाजपाच्या ‘सरल ॲप’ विषयी विस्तृत माहिती दिली. सत्र अध्यक्ष गौतम लटके होते.
रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य धनंजय सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वर्गास भाजपाचे अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवासी उपस्थित आहेत.