कुभेफळ ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर; कामात भ्रष्टाचार केल्याने सरपंच आणि ग्रामसेवकाला ६८ हजार रुपये भरण्याचे आदेश .

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील मौजे कुभेफळ येथे ग्रामपंचायतीच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत कुभेफळ येथील सरपंच आणि ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विकासकामे पूर्ण न करता ६८,२०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गट विकास अधिकारी (BDO) विनोद जाधव यांनी कडक पावले उचलली असून संबंधित रक्कम १५ दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुभेफळ ग्रामपंचायत अंतर्गत काही विकासकामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही कामे न करताच निधीचा विनियोग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. एकूण ६८,२०० रुपयांची ही अफरातफर असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली.

गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी या प्रकरणाची दखल घेत सरपंच आणि ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे. शासनाची दिशाभूल करून लाटलेली ही रक्कम १५ दिवसांच्या मुदतीत शासकीय तिजोरीत जमा करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत रक्कम जमा न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट कारभार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महत्वाचे :- वरील सरपंच / ग्रामशेवक यांणा ६८२०० रुपय भरणा करण्यासाठी गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी दिलेले आदेश तक्रारदार उपसरपंच फारूक शेख यांना मान्य नाही विस्तार अधिकारी कोठे यांनी चुकीचे पंचनामा करून खोटा अहवाल दाखल केले व सूनावनी मध्ये गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांचे मत ऐकूण न घेतल्याने आदेश मान्य नाही .

error: Content is protected !!