पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी):वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४३,३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून मोठ्या प्रमाणात चोरलेला कॉपर केबलचा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने मौजे वाशी शिवारातील शेत गट नं. 279 ब येथे लपवून ठेवलेली आहेत. या माहितीच्या आधारे पोह/१२३५ के.एस. बोरकर व पोलीस अंमलदार/११७३ शेळके यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. माहिती सत्य असल्याचे समजताच पोलीस पथकाने तातडीने छापा टाकला.
जप्त केलेला मुद्देमाल:
छाप्यादरम्यान पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला:

  • कॉपर केबल: ५३ बंडल (अंदाजे वजन १,५०० किलो) – किंमत १७,१०,०००/- रुपये.
  • ट्रक (MH 12 CH 5290): अंदाजे किंमत २५,००,०००/- रुपये.
  • दुचाकी (MH 25 BD 5538): अंदाजे किंमत १,२५,०००/- रुपये.
  • एकूण जप्त किंमत: ४३,३५,०००/- रुपये.
    तपासातील निष्पन्न माहिती:
    प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून वाशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांत सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात खालील सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे:
    १) राजेंद्र गुलाब काळे २) माणिक गुलाब काळे ३) दया माणिक काळे (सर्व रा. कासारखानी, पारधी पिढी, वाशी) ४) रामा उर्फ शेंडी सुबराव काळे ५) बबलू मधुकर शिंदे (दोघे रा. तेरखेडा) आणि ६) सचिन बापू शिंदे (रा. इटकूर, ता. कळंब).
    सदर कारवाईचा पंचनामा करून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सिरेटीका कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून मालाची खातरजमा करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर मॅडम , मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शिंदे पोहेका/ कपिल बोरकर , राम शेळके, विठ्ठल मलंगनेर , गोपीनाथ पवार, नसीर सय्यद यांचे पथकाने केली.

Leave a Reply

error: Content is protected !!