दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्यात वाढ ; UDID-आधार लिंक व DBT नोंदणी अनिवार्य

धाराशिव,दि.२५ मार्च (माझं गांव माझं शहर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय १५ सप्टेंबर २०२५ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणा-या अर्थसहाय्यात १५०० रुपयांवरून २५०० रुपये वाढ करण्यात आलेली असून ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आलेली आहे.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय २४ फेब्रुवारी २०२६ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग कल्याण विभागाकडे माहे एप्रिल २०२६ पासून वर्ग करणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने श्री.तुकाराम मुंढे,सचिव दिव्यांग कल्याण विभाग,यांनी विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग प्रवर्गामधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी यांचे UDID कार्ड त्यांच्या आधारशी संलग्न करणे तसेच महाडीबीटी पोर्टलवर त्यांचा युडीआयडी क्रमांक भरणेबाबत सर्व जिल्हाधिकारी, शासकिय रूग्णालयाचे अधिष्ठाता,जिल्हा आरोग्य अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संवाद साधला असून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वरील बाबी अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढणार आहे.

युडीआयडी कार्डला आधार लिंक कुठे व कसे करावे याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले आहे :
दिव्यांग लाभार्थी यांचे UDID कार्ड त्यांच्या आधारशी संलग्न करणेसाठी UDID पोर्टलवर जाऊन लाभार्थ्यांचे एनरोलमेंट नंबर किंवा UDID क्रमांक व जन्म दिनांक टाकून लॉग इन झाल्यानंतर E-KYC मध्ये लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी जनरेट करुन (सदरचा ओटीपी लाभार्थ्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जाणार आहे.)आधार व्हेरीफाईड करुन केवायसी करणे.सदर सुविधा आपले सरकार सेवा केंद्र,सीएससी सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रावर उपलब्ध आहे.

यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड, युडीआयडी कार्ड (ऑनलाईन पध्दतीने काढण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र) तसेच आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे.ज्या लाभार्थ्यांकडे ऑफलाईन पध्दतीने काढण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र असतील त्यांनी अद्ययावत युडीआयडी कार्ड मिळण्यासाठी युडीआयडी पोर्टलवर विनंती अर्ज सादर करावा.

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग प्रवर्गामधून दरमहा २५०० रुपये अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरीफाय झाल्यानंतर DBT पोर्टलवर लाभार्थ्यांचे UDID क्रमांक अद्यावत करणे आवश्यक आहे.यासाठी सदर दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांच्या युडीआयडी कार्ड व आधार कार्डची प्रत गावातील तलाठी कार्यालयात किंवा तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामध्ये जमा करावी.

वरीलप्रमाणे विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग प्रवर्गामधून अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी क्रमांकाची पडताळणी, युडीआयडी क्रमांकास केवायसी करणे (KYC) व युडीआयडी क्रमांकाची नोंदणी डीबीटी पोर्टलवर करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!