कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

कळंब(माझं गांव माझं शहर) शहरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या काही जणांनी शहरातील एका हॉटेलमध्ये घुसून दहशत माजवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच जेवणासाठी आलेल्या एका युवकावर वजनदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी शहरातील हॉटेल प्रेरणा येथे सुमारे आठ ते दहा जणांचे टोळके अचानक आले. त्यांनी वेटर व इतर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी जेवणासाठी आलेले सुमीत मोदी या युवकाच्या डोक्यात वजनदार वस्तू मारल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी मोदी यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाद मिटल्यावरही हेच टोळके पुन्हा हॉटेलमध्ये परत येऊन शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली नाही. दरम्यान, कळंब शहरात मागील काही वर्षांपासून शांत असलेले वातावरण पुन्हा अस्थिर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मागील महिन्यात शहरातील मुख्य चौकात पोलिसांसमोरच हाणामारी झाली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी एका विशिष्ट समाजातील दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. त्या दोन्ही गटांनी दोन दिवस शहरात दहशत माजवली होती. त्या घटनेतही गुन्हा दाखल झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चौकट : नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना मागील काही दिवसांपासून कळंब शहरात वारंवार हाणामारीच्या घटना घडत आहेत. मात्र या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांविरोधात अद्याप कठोर कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत.

चौकट : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह भर चौकात भांडणासारख्या घटना घडत असतानाही अनेक वेळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

error: Content is protected !!