परंडा : एका माजी सैनिकाविरुद्ध खोटी फौजदारी तक्रार दाखल करून सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न संबंधितांना चांगलाच महागात पडला आहे. परंडा येथील न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत संबंधित प्रतिवादींना माजी सैनिकास तब्बल पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील हिंगणगाव (बु.) येथील माजी सैनिक मधुकर नवनाथ बिडवे यांनी सन १९९० ते २०१५ या कालावधीत गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले होते. दरम्यान, २०१४ मध्ये त्यांच्याविरोधात खोटी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने २०२२ मध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
या खोट्या प्रकरणामुळे सामाजिक मानहानी व मानसिक त्रास झाल्याचा दावा करत माजी सैनिक मधुकर बिडवे यांनी न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर परंडा येथील सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. टी. इंगळे यांनी फिर्यादीच्या बाजूने निकाल दिला.
न्यायालयाने प्रतिवादींना एक महिन्याच्या आत माजी सैनिक मधुकर बिडवे यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे खोटे गुन्हे दाखल करून त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना चाप बसणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
फिर्यादीच्या वतीने अॅड. संतोष सूर्यवंशी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. अनिकेत जगताप, अॅड. नाना शिंगारेकर आणि अॅड. निरंजन कोरे यांनी सहकार्य केले. निकालाचे परिसरात स्वागत होत असून, न्याय मिळाल्याची भावना माजी सैनिक मधुकर बिडवे यांनी व्यक्त केली आहे.
