मुस्लिम समाज आक्रमक; संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी !जातीय वक्तव्य प्रकरणी परंडा शहर बंदची हाक.

माझं गांव माझं शहर | परंडा नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत जातीय व आक्षेपार्ह अपशब्द वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेच्या निषेधार्थ परंडा शहरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही निलंबनात्मक अथवा कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने संतप्त मुस्लिम बांधवांनी शनिवार दि. ०९ मे २०२६ रोजी परंडा शहर बंदची हाक दिली आहे.

यासंदर्भात परंडा व्यापारी महासंघाला निवेदन देण्यात आले असून, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व आस्थापने बंद ठेवून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “समस्त मुस्लिम समाज, परंडा” यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे जातीय स्वरूपाचे अपशब्द वापरले. या घटनेमुळे समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने व्यापारी महासंघाकडे अधिकृत निवेदन सादर करत शहर बंद आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. “संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे शनिवारी परंडा शहरातील बाजारपेठ, व्यापारी आस्थापने तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

error: Content is protected !!