धाराशिव,दि.२६ सप्टेंबर (माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील ५ टक्के दिव्यांग सेस अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य तसेच अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना सहाय्य या योजनांचा समावेश आहे.
पूर्वी अर्ज स्वीकृतीसाठी २६ सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.मात्र लाभार्थी व दिव्यांग संघटनांच्या विनंतीनुसार आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून,अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
अर्जाचा विहीत नमुना,आवश्यक अटी-शर्ती व जोडावयाची कागदपत्रांची माहिती सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अर्जाचे नमुने dharashiv.nic.in व www.zpdharashiv.gov.in या संकेतस्थळांवरही पाहता व डाउनलोड करता येतील.
जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद धाराशिव व दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटना यांनी केले आहे.