अवैध बिल आकारणे व धर्मादाय नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण; धर्मदाय आयुक्तांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

बार्शी (प्रतिनिधी)शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटलने अधिक आणि अवैध बिल आकारल्याबाबत एका रुग्णाने गंभीर तक्रार नोंदवली असून, या प्रकरणात शासन निर्देश आणि धर्मादाय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने पुणे विभागातील धर्मादाय आयुक्त आणि सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे ही तक्रार नोंदवली असून, बार्शी ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत सदर तक्रार पाठवली आहे.

जगदाळे मामा हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली नोंदणीकृत असल्याने रुग्णांना पारदर्शक आणि शासननियमाप्रमाणे बिल देणे बंधनकारक असतानाही, सदर रुग्णास उपचारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले गेल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीनुसार, सर्व धर्मादाय रुग्णालयांना रुग्णांना स्पष्ट बिल देणे आणि माहितीफलक लावणे सक्तीचे असतानाही सदर रुग्णालयात याचे पालन केले जात नाही. उपचार घेत असताना रुग्णांकडून चुकीची आणि जास्त रक्कम वसूल केल्याने रुग्ण हक्क आणि माहिती अधिकार कायद्याचेही उल्लंघन केले गेले आहे. यामुळे रुग्णांना बिलाचे स्पष्ट तपशील मिळाले नाहीत आणि पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसून आला.

या प्रकरणात तक्रारदाराने कठोर कारवाईची मागणी केली असून, हॉस्पिटलची चौकशी करून शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर पावले उचलावीत असे म्हटले आहे. तसेच, अतिरिक्त आकारलेली रक्कम रुग्णांना तात्काळ परत करून द्यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हॉस्पिटलला शासन निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत आणि चौकशी अहवालाची प्रत तक्रारदाराला द्यावी, अशी मागणीही पत्रात नमूद केली आहे.

या घटनेमुळे जगदाळे मामा धर्मादाय रुग्णालयामधील बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या रुग्णालयात रुग्ण हक्कांसाठी शासनाच्या निर्देशांचे पालन होते की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या रुग्णालयाबाबत वारंवार अनेक तक्रारी होत असूनही सोलापूर धर्मदाय कार्यालयाकडून कोणतीही उचित कारवाई केली जात नसल्यामुळे सोलापूर धर्मदाय कार्यालयही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

error: Content is protected !!