बार्शी(प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस आणि वाहनांमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बस नियम २०११ चे पालन होत नसल्याच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तात्काळ तपासणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बार्शीतील तक्रारदार यांनी १२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत, बार्शी तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये शासनाच्या २२ मार्च २०११ च्या निर्णयानुसार लागू असलेल्या स्कूल बस नियमांचे पालन होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नियमांमध्ये बसची सुरक्षितता, क्षमता, चालकाची पात्रता आणि अन्य सुरक्षा उपायांचा समावेश आहे. तक्रारीनंतर आरटीओने त्वरित कारवाईचे पाऊल उचलले आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी जारी केलेल्या आदेशात, वायुवेग पथकास बार्शी तालुक्यातील सर्व शाळांच्या मालकीच्या तसेच कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा आणि वाहन मालकांना इशारा मिळेल तसेच बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“विद्यार्थ्यांची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आग्रही आहे. तपासणीअंती दोषी वाहनांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.”
असिफ मुलाणी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.