परंडा दि.६ (प्रतिनिधी) निम्न खैरी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पांढरेवाडी गावाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले असले, तरी पांढरेवाडी (पश्चिम) गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने जलसंपदा विभागाकडे निवेदन देत तात्काळ उपाय -योजनांची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पांढरेवाडी (पश्चिम) येथे रस्ते, पूल, आरोग्य व वीज यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. पांढरेवाडी (पश्चिम) ते शेळगाव, सक्करवाडी व चिंचपूर (बु) – लंगोटवाडी मार्ग या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था असून अनेक ठिकाणी पुलांची कामे प्रलंबित आहेत. विशेषतः शेळगाव -जवळील खैरी नदीवरील मोठा पूल अद्याप झाला नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य सेवांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज पुरवठ्याबाबतही परिस्थिती बिकट असून सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन मूलभूत सुविधा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे