शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

परंडा, दि. १७ : परंडा तालुक्यातील मुगाव गावातील रमेश बजिरंग जगताप यांनी शून्यातून व्यवसाय उभा करून संघर्षातून यशाचा प्रवास घडवला आहे. सुरुवातीला शहरात वडील बजिरंग जगताप ठेकेदाराकडे काम करत असत. त्यांच्या प्रेरणेने आणि परिस्थितीपायी रमेशही मूळ गाव सोडून परंडा शहरात स्थायिक झाले.

काय व्यवसाय करायचा हेही ठरत नव्हते, पण शेवटी वडिलांच्या ओळखीच्या भीमसिंह ठाकूर यांच्या पेट्रोल पंपावर काम करण्यास सुरूवात केली. दरम्यान, लग्न झाल्याने आर्थिक गरजा वाढल्या, खर्च भागवणे कठीण होत होते. याच वेळी शहरातील प्रसिद्ध साहित्यिक तु. दा. गंगावणे यांनी रमेश यांना जवळ घेतले, त्यांना भाड्याने राहण्यासाठी घर दिले आणि मानसिक आधार दिला.

या मदतीने आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर रमेश जगताप यांनी कटलरी व स्टेशनरी विक्रीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. प्रारंभी गंगावणे यांच्या घरीच हा व्यवसाय सुरू झाला. दरम्यान, पत्नीला अंगणवाडी सेविका म्हणून काम मिळाले, त्यामुळं दोघांनी मिळून कुटुंबाचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. अत्यंत सचोटी, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर रमेश यांनी व्यवसायात यश संपादन केले.

आज या लघु व्यवसायातून त्यांनी एक मालवाहू वाहन (पिकअप) खरेदी केली आहे. वाहनाची पूजा करताना रमेश यांच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले — आपल्या मुलाने झगडून उभा केलेला संसार पाहून ती हरखून गेली.

रमेश जगताप यांनी दाखवलेली ही वाटचाल म्हणजे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. परिस्थितीवर मात करत, आधार शोधत, जिद्दीने यशाचा मार्ग शोधणाऱ्या या युवकाचे परंडा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!