भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा बैठक संपन्न

पुणे,माझं गां माझं शहर| प्रतिनिधी

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती व विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी आगामी काळात शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीत यंदाच्या संभाव्य कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चा करण्यात आली. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पेरणीपूर्व नियोजन, पशुधन संरक्षण, संभाव्य पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा व चारा छावण्यांचे आगाऊ नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक गावांमध्ये महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना अखंडित व नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिवसेना गटनेते संदेश (विकी) चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य सुनील उंदरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

या बैठकीस जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, भैरवनाथ शुगर वर्क्स लि.चे व्हाईस चेअरमन केशव सावंत, रामचंद्र घोगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!