भूम, प्रतिनिधी : शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्या तरी एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना अपंगत्वाची योग्य टक्केवारी मिळत नसल्याचा आरोप करत मराठवाडा अपंग संघटनेच्या वतीने भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या नागरिकांना ५० टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मराठवाडा अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही पूर्णतः एक डोळा निकामी झालेल्या लाभार्थ्यांना केवळ ३० टक्के अपंगत्व दाखवले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या मागण्यांसाठी दि. १२ जूनपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ लोखंडे यांच्यासह श्रीकांत केदारी, बबन टकले, कांता साठे, प्रेमराज माने आणि माणिक खंडागळे हे उपोषणात सहभागी झाले आहेत.
प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन संबंधित धोरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
