प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखेर मंजूर

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार

माझं गांव माझं शहर | धाराशिव

स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या निधीच्या वितरणासाठी प्रहार संघटना यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मागील दिवाळीपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, प्रहार संघटनेमुळे शहरातील हजारो दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका येथे जाऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, निधी तात्काळ वितरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.

दरम्यान, नगरपालिकेकडून दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के निधी संदर्भातील ठराव संमत झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रहार संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. लवकरच शहरातील दिव्यांग बांधवांना या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याने दिव्यांग नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात शहरातील दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्यांनी तात्काळ प्रहार संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी केले आहे.

या वेळी जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष जमीर शेख, तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे, तालुका समन्वयक दिनेश पोद्दार, सबदार शेख, लक्ष्मण जाधव, धनंजय खांडेकर, मेहबूब तांबोळी, समाधान खांडेकर, किशोर कांबळे, अमोल पाडे, आजीज कोतवाल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!