प्रेमविवाहानंतर सततच्या वादातून घडली धक्कादायक घटना; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
माझं गांव माझं शहर | बार्शी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि.२५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून, आरोपी पतीचे नाव ऋषिकेश पाटील असे आहे. दोघेही एका खाजगी बँकेत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बार्शी-परंडा रोडवर धनश्री पाटील या स्कुटीवरून जात असताना ऋषिकेश पाटील याने त्यांना अडवले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेश याने सोबत आणलेल्या चाकूने धनश्रीवर हल्ला केला.
आरोपीने संतापाच्या भरात धनश्रीवर वारंवार चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या धनश्री या घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बार्शी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
