शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणी; शिवप्रेमींचा जल्लोष, प्रशासनाकडून परवानगीची सूचना.

परंडा, दि. १ : परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याची घटना घडली. सकाळी नागरिकांना पुतळ्याचे दर्शन होताच शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, फटाके फोडून आणि जयघोष करत जल्लोष साजरा करण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नियोजित चबुतऱ्यावर पुतळा स्थापित करण्यात आला. सकाळी शिवभक्तांनी एकत्र येत नारळ फोडून व विधिवत पूजा करून महाराजांना अभिवादन केले.

या वेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाप्रमुख रणजित पाटील, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, माजी जिल्हा परिषद सभापती नवनाथ जगताप, उद्योजक रामभाऊ पवार, शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, मेघराज पाटील, अॅड. जहीर चौधरी, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, धीरज ठाकूर, बालाजी महाराज बोराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

फटाके फोडून जल्लोष
पुतळा उभारणीनंतर शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. “पुतळा हटवू देणार नाही” अशी ठाम भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, पुतळा उभारणीसाठी पूर्वपरवानगी न घेतल्याने पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही कृती करण्यापूर्वी शासनाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलेश काकडे व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले यांनी शिवभक्त व राजकीय पदाधिकाऱ्यांची शांतता बैठक घेतली. पुतळा उभारणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले. पुतळ्यासाठी आवश्यक ती शासकीय परवानगी मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासनही देण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौक व परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!