तक्रारीकडे दुर्लक्ष; गट विकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

परंडा-दि.१(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अंतर्गत “आपले सरकार सेवा केंद्र” संबंधित गंभीर अनियमिततेबाबत दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, जिल्हा धाराशिव यांनी गट विकास अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव तसेच तहसीलदार, परंडा यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.

महासंघाच्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑपरेटरकडून अधिकृत आयडीचा गैरवापर होत असल्याची तक्रार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती परंडाचे गट विकास अधिकारी श्री. विनोद जाधव यांच्याकडे पुराव्यासह लेखी स्वरूपात करण्यात आली होती. या आयडीच्या माध्यमातून परंडा शहरात दुकाने चालवून लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, संबंधित व्यवहारांमधून मिळालेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे का, किती रक्कम जमा झाली, कोणती कामे करण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली होती. मात्र, तक्रार दाखल करूनही बराच कालावधी उलटून गेला असून अद्याप कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप महासंघाने केला आहे.

महासंघाने पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार कोणत्याही गंभीर तक्रारीवर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा प्रकार कर्तव्यात कसूर (Dereliction of duty) असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, “आपले सरकार सेवा केंद्र” व महा-ऑनलाइन प्रणालीतील व्यवहारांचा डेटा सुरक्षित ठेवण्याबाबतही प्रशासनाने स्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा डेटा न मिळाल्यास त्याची जबाबदारी संबंधित ऑपरेटर व गट विकास अधिकाऱ्यावर निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनासोबत ५ मार्च २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जाची पावतीही जोडण्यात आली आहे. प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!