बाजार समिती कळंबचा कारभार स्वच्छ; ४६ गाळे खुले लिलावानेच देणार सभापती शिवाजी कापसे

कळंब (अमर चोंदे) – कृषि उत्पन्न बाजार समिती कळंब येथे ४६ गाळ्यांचे वाटप परस्पर करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात असून त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचा खुलासा बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी केला आहे. बाजार समितीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून कोणताही गाळा अद्याप कोणालाही वाटप करण्यात आलेला नाही, असे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दि. २१ मार्च २०२६ रोजी काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या वतीने हा खुलासा करण्यात आला. बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असून संचालक मंडळाच्या सहकार्याने सत्तर वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य बाजार आवारात स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) या संकल्पनेअंतर्गत ४६ गाळे बांधकामासाठी प्रस्ताव मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अटी व शर्तींसह वर्तमानपत्रात जाहिरात देण्यास मान्यता देण्यात आली होती.

दरम्यान बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे गाळे वाटपाच्या जाहिरातीस विलंब झाला. आचारसंहिता संपल्यानंतर दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दै. पुढारी व लोकमत टाइम्स या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर गाळ्यांचा लिलाव दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्याचे नियोजन होते. मात्र या लिलावाला व्यापारी वर्ग किंवा इच्छुकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.
फेरलिलाव आणि नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचा विषय येणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत मांडण्यात येणार असून त्यासंदर्भातील सभा नोटीस दि. १८ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आल्याची माहितीही कापसे यांनी दिली. त्यामुळे गाळे परस्पर वाटप झाल्याच्या बातम्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत शेतकरी भवन व गाळे बांधकामाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. तसेच बाजार समिती परिसरातील सुमारे ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या रस्ते कामांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. विद्युत तारामुक्त परिसर, वृक्षलागवड, पाणीपुरवठा योजना आदी कामांचेही नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय परवाना घेऊन कोणताही व्यवसाय न करणाऱ्या किंवा गाळा व भूखंड नसलेल्या सुमारे ४०० परवान्यांची रद्द प्रक्रिया करण्यात आली आहे. कोणतेही कर्ज न घेता बाजार समितीचा कारभार चालवण्यात येत असून गेल्या तीन वर्षांत बाजार समितीच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मा. उपसभापती भवर बाबा व सर्व संचालकांच्या सहकार्यामुळे बाजार समिती विकासाच्या टप्प्यावर असून शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मा.सभापती शिवाजी कापसे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेत कळंब तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!