परंडा (तानाजी घोडके): महाराष्ट्र राज्य सरकारी लिपिक संवर्गीय हक्क समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, परंडा येथील विविध शासकीय कार्यालयांतील लिपिक कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि इतर विभागांतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
प्रमुख मागण्या:
आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक संवर्गाच्या वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटी दूर करण्यात आलेल्या नाहीत. प्रामुख्याने १९०० ग्रेड पे ऐवजी २४०० ग्रेड पे लागू करावा, ही लिपिकांची जुनी मागणी आहे. याशिवाय पदोन्नतीतील अडथळे आणि इतर भत्त्यांबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
कामकाजावर परिणाम:
सकाळपासूनच लिपिक कर्मचाऱ्यांनी प.स. कार्यालयाबाहेर जमा होऊन घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे दाखले मिळवणे, शासकीय योजनांचे अर्ज भरणे आणि इतर दैनंदिन प्रशासकीय कामे रखडली आहेत. दूरवरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पुढील पवित्रा:
“जोपर्यंत शासन आमच्या न्याय्य मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा परंडा तालुका लिपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्ग न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे .
या आदोलनांत श्री प्रफुल्ल गोडगे आप्पा महानवर बळीराम घोडके सुबोध देशमुख अभय कुलकर्णी विशाल बारस्कर कदम अकबर तांबोळी उमेश हींगे .श्रीम सुषमा माने विजया कुंभार .सुवर्णा वाघमारे बागूल संजिवनी नटवे राणी ननवरे इत्यादी कर्मचारी आंदोलणात सहभागी होते .