तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या नित्योपचार पूजेला भाविकांची गर्दी

तुळजापूर, २५ (माझं गांव माझं शहर ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला तुळजापुरात मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला, म्हणजेच आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी, देवीची नित्योपचार पूजा मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत श्री तुळजाभवानी देवीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर देवीची आरती करण्यात आली. चौथ्या माळेनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या.यापूर्वी, काल बुधवार, २४ सप्टेंबर रोजी देवीची ‘गरुड’ वाहनातून भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तुळजापूर आणि आसपासच्या परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात दिवसरात्र भाविकांची वर्दळ दिसून येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आगामी दिवसांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

error: Content is protected !!