तुळजापूर नगरपालिका निवडणूक: भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याचे ओमराजे निंबाळकरांचे आवाहन.

तुळजापूर (प्रतिनिधी) आगामी काळात येऊ घातलेल्या तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीने (मविआ) ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल (ताई) वडने आणि ऋषिकेश (भैय्या) मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर नगरपालिकेतील सध्याच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेत ‘सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता’ असा खेळ सुरू आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांचे मूळ प्रश्न मागे पडले असून, अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर आणि तरुण पिढीच्या भविष्यावर बसत आहे.”

महाविकास आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा असेल, असे आश्वासन नेत्यांनी दिले. “भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. तुळजापूरकरांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्यावी आणि शहरात स्वच्छ, प्रामाणिक व जनतेच्या हिताचे प्रशासन स्थापन करावे,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा समन्वयक शाम पवार, माजी शहर प्रमुख सुधीर कदम, कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख राहुल खपले, शहर संघटक अर्जुन साळुंके, उप शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी, महिला आघाडी शहर संघटिका शोभा शिंदे, मिना कांबळे, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!