परंडा(तानाजी घोडके ) :- तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक शाळेच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरचेवर ओस पडू लागल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे त्याच गावात राहतात, असे सांगून घरभाडे उचलतात.’शासनाची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात आहे. परंडा तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर प्राथमिक शाळा आहेत. पण या शाळांतील पटसंख्या कमी, शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे याला पालक व शिक्षक हेच जबाबदार आहेत. खासगी शाळेच्या झगमगाटामुळे खासगी शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढू लागला आहे. मात्र, या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक हे योग्यता प्राप्त नाहीत. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फीमधून मानधन दिले जाते तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ज्या पात्रतेचे शिक्षक असणे गरजेचे आहे मात्र खासगी शाळेत याचा अभाव असल्याचे समजते. तसेच खासगी शाळेत, कॉलेजमध्ये अपात्रतेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अनेक शाळेतील पटसंख्या कमी होण्यासाठी शिक्षक हेच जवाबदार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी गावनिहाय शिक्षक मुख्यालयी राहतात की याची तपासणी करण्यात यावी. सध्या बहुतांशी शिक्षक हे करमाळा, भूम, जामखेड, माढा,बार्शी तालुक्यातून आपल्या वेळेनुसार ये-जा करीत आहेत. काही शिक्षकांचा तर दुपारनंतर आपल्या घराकडे जाण्यासाठीचा ओढा दिसून येतो. तसेच ज्या गावातील राजकीय पदाधिकारी यांना धरून राहतात त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेबर वाईट दिवस आले आहेत. तेव्हा शिक्षकांना मुख्यालयी राहाण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.