परंडा, दि. १- परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक आढळून आल्या आहेत. अशा सर्व वर्गखोल्या तत्काळ पाडण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि शिक्षणाधिकारी यांनी युक्तरीत्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.तालुक्यातील नालगाव, जामगाव, भांडगाव, देऊळगाव, सावदरवाडी, पिंपळवाडी, डोंजा, घारगाव, कांदलगाव, ब्रह्मगाव या गावातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. या खोल्यांचे बांधकाम झिजल्यामुळे जीर्ण झाले आहे. भिंतींना तडे जाऊन मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
त्यामुळे या वर्गखोल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिला होता. शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर या धोकादायक वर्गखोल्यांच्या बांधकामाचे लेखापरीक्षण होऊन त्या धोकादायक असल्यामुळे पाडण्यात यावेत, असा अंतिम अहवाल देण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी या वर्गखोल्या पाडण्याची जबाबदारी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी त्या-त्या गावातील धोकादायक वर्गखोल्या ग्रामपंचायतीच्या मदतीने पाडकाम करून घ्यावयाचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींचा स्वःनिधी किंवा वित्त आयोगातून प्राप्त होणारे अनुदान खर्च करावयाचे आहे. धोकादायक वर्गखोल्या पाडण्याची प्रक्रिया मागील सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. या वर्गखोल्या न पडल्यामुळे त्या ठिकाणी नव्या खोल्या बांधल्या गेल्या नाहीत, याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. धोकादायक वर्गखोल्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा खासगी शाळांच्या आकर्षक इमारतीकडे वाढला आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होण्यावर होत आहे.