“तहसील व पंचायत समितीचा परिसर झाला गाजरगवताचा माळ ; प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष

परंडा, दि.२९(तानाजी घोडके ) तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालयासह शेजारील पंचायत समिती परिसराची स्वच्छतेची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी, महिला आणि नागरिकांना येथे मूलभूत सुविधांचाही अभाव भासत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.

तहसिलदार निलेश काकडे यांच्या कार्यकाळात कार्यालयीन शिस्त कोलमडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय पूर्णतः बंद आहे — फिल्टर टाकी धुळखात पडून आहे. विशेष म्हणजे, महिला कर्मचाऱ्यांसह आलेल्या महिला नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची अत्यंत गैरसोय आहे. यामुळे महिलांची मोठी कुचंबना होत आहे.

गाजरगवत, रानगवत आणि कचऱ्याने संपूर्ण परिसर व्यापलेला असून, त्यामुळे डास-मच्छरांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. तसेच, पार्किंगची सुद्धा नीट व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत, परिणामी वाहतूक कोंडी आणि गोंधळ वाढतो आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान” राबवून देशभर स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले असताना, तहसील आणि पंचायत समिती परिसर मात्र या संकल्पनेच्या पूर्ण विरोधात उभा आहे. स्वच्छता मोहिमेचा आत्मा येथे फक्त फलकांवरच दिसतो, अशी नागरिकांची तीव्र भावना आहे.

अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या कामात तत्पर असले तरी भौतिक सुविधा कालांतराने जीर्ण झाल्यामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचा विश्वास आहे की प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि लवकरच तहसील व पंचायत समिती परिसर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श स्वरूपात दिसेल.

स्वच्छ व नीटनेटके वातावरण निर्माण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि “जनतेच्या सेवेसाठी असलेली कार्यालये” हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.

error: Content is protected !!