परंडा : प्रतिनिधी शहरात नगर परिषद निवडणुकीत १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीत दाखल झालेल्या एकुण १३८ अर्जातील १०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर ३६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत, यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आठ उमेदवारांपैकी पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्याने एक व डमी एक असे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज शिल्लक राहिले आहेत. यावेळी सदस्य पदांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यावरून दोन गटात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर दगडफेकीत झाले. परंतु पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा राडा होण्याचा टळला असला तरी शहरात तणावपुर्वक शांतता आहे.
नगराध्यक्ष पदासाठीचे २ तर सदस्य पदासाठीचे ३३ अर्ज बाद
दोन गटात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पडसाद नगरपरिषद गेट समोर उमटले व दोन गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. यावेळी पो. निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरिक्षक शंकर सुर्वेसह पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसट व पोलीसांनी हस्तक्षेप करून जमावास पांगवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसुन येत असुन सध्या शहरात तणावपुर्ण शांतता आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पो. अधिकारी अनिल चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.