परंडा, दि. १८(तानाजी घोडके) दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसीस सेंटर आणि केमोथेरपी केअर -डे सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुख्तार हावरे यांनी तहसीलदारमार्फत केली आहे.
परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या किडणी विकाराच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले डायलिसीस सेंटर व कॅन्सर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले केमोथेरपी डे केअर सेंटर मंजूर करण्यात यावे, त्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची होणारी आर्थिक, मानसिक व शारीरिक हेळसांड थांबण्यास मदत होईल.
परंडा तालुका हा धाराशिव जिल्ह्यात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. या तालुक्याची लोकसंख्या दीड लाखावर आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला संकरीत खान-पान, दूषित हवामान, प्रदूषित वातावरण व आधुनिक खाद्यसंस्कृतीमुळे नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. यामुळे दुर्धर आजाराच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे दुर्धर आजार जितका त्रासदायक आहे तितकाच खर्चीक आहे. ज्या घरात दुर्धर आजाराचा रुग्ण असतो. त्या घराची आर्थिक व मानसिक परिस्थिती ही पूर्णपणे कोलमडून जाते त्यामुळे रुग्णांच्या उपचारावर होतो. परिणाम कारण दुर्धर आजारांवर उपचार करण्याची शासकीय
व्यवस्था स्थानिक रुग्णालयात नाही. परंड्यासह प्रत्येक तालुक्याच्या शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी दुर्धर आजाराने ग्रासित किडनी विकाराच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले डायलिसीस सेंटर व कॅन्सर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले केमोथेरपी केअर सेंटर मंजूर करून सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुख्तार हावरे यांनी केली आहे.