कोळेगाव धरणात मासे चोरीचा धक्कादायक प्रकार; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीर मासेमारी करून हजारो रुपयांचे मासे चोरीला नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सहा जणांसह इतरांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महावीर विलास भोई (रा. आलेवर, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छत्रपती मत्स्य व्यवसाय संस्थेकडे २०२५ ते २०२९-३० या कालावधीसाठी कोळेगाव धरणातील मासेमारीचा वैध करार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून संस्थेच्या सभासदांना अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात मासे मिळत असल्याने संशय निर्माण झाला होता.

रात्रीचा डाव; धरणातून थेट मासे बाहेर

संस्थेच्या वॉचमन व कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यानंतर १८ मेच्या रात्री ते १९ मेच्या पहाटेदरम्यान काही जणांनी धरण परिसरात गुप्तपणे मासेमारी केल्याचे उघड झाले. आरोपींनी सुमारे ५०० किलो कोळंबी व कटला जातीचे मासे पकडून नदीकाठावर आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कामगारांनी विरोध करताच आरोपींनी मासे घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीमुळे संस्थेचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

धमक्या आणि खोट्या तक्रारीचा आरोप

घटना उघड झाल्यानंतर काही महिलांनी संस्थेच्या वॉचमनला शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिंटू रामसिंग सल्ले, तानाजी विक्रम नगरे, पदमसिंह शिंदे, राजेंद्र दयराम सल्ले, बालाजी मच्छिंद्र नगरे, मच्छिंद नगरे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मत्स्य व्यवसायिकांचा इशारा

“अधिकृत परवानाधारकांचे नुकसान करून बेकायदेशीर मासेमारी सुरू राहिली तर कठोर आंदोलन करू,” असा इशारा मत्स्य व्यवसायिकांनी दिला आहे. तसेच धरण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त, रात्रीची गस्त आणि नियमित तपासणीची मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, कोळेगाव धरण परिसरात सुरू असलेल्या कथित मासे चोरीच्या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करमाळा पोलिसांकडून सुरू आहे.

error: Content is protected !!