परंड्यात ९ जुगार अड्ड्यांवर धाड ; ऑनलाइन चक्री जुगाराचे जाळे उद्ध्वस्त; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)परंडा शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार आणि जुगार अड्ड्यांवर अखेर मोठी कारवाई करण्यात आली. धाराशिव पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी विशेष पथकासह एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी करत अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले.

या कारवाईदरम्यान ऑनलाइन चक्री जुगारासाठी वापरले जाणारे संगणक, रोख रक्कम, टेबल, कुलर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असतानाही स्थानिक परंडा पोलीस ठाणे यांना याची माहिती कशी नव्हती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी स्थानिक पोलिसांना विश्वासात न घेता थेट विशेष पथकासह धाड टाकली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोमवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र भंवर यांच्यासह विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शहरातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या या जुगार अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या धडाकेबाज कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपासानंतर या जुगार रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!