धाराशिव | प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज दि. २२ मे २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देत लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीच्या अपहरण प्रकरणातील फरार आरोपींवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उंडरगाव येथील दिलीप वाघमारे यांच्या अल्पवयीन मुलीस गावातील हनुमान दगडू माने व आशा दगडू माने यांनी जबरदस्तीने घरातून मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर संबंधित मुलीला तोरंबा टाकी (ता. लोहारा) येथील संतोष राम गायकवाड यांच्या हवाली करून आरोपी फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेबाबत लोहारा पोलीस ठाण्यात दि. १६ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तब्बल एक महिना उलटूनही मुलगी व आरोपींचा शोध लागलेला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अपहरण तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यात वाढ करून आरोपींना तात्काळ अटक करावी व अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे, जिल्हा सरचिटणीस मा. सिद्धार्थ ओव्हाळ, जिल्हा कार्याध्यक्ष मा. बाबासाहेब मस्के, मा. एस. के. गायकवाड, जिल्हा सचिव मा. भालचंद्र कटारे, तालुका अध्यक्ष धाराशिव मा. बाबासाहेब बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष तसेच मुलीचे आई-वडील व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

You must be logged in to post a comment.