परंडा: परंडा शहरातील अतिक्रमण तात्काळ हटवावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच परंडा नगर परिषद मुख्याधिकारी यांना सोमवारी (दि.१४) निवेदन देऊन देण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. सौदागर, मसरत काझी, माजी नगरसेवक साबेर सौदागर, वाजीद दखनी, मतीन जिनेरी, इरफान शेख, सरफराज कुरेशी, जावेद पठाण, राजा माने, बच्चन गायकवाड, रत्नकांत शिंदे, संजय घाडगे, मनोज कोळगे, संदीप शेळके, मुस्सा हन्नुरे, धनाजी जाधव, जयंत शिंदे, शंतनू मेहेर, अतिक शेख, संजय शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हंटले की, परंडा शहरातील जुन्या तहसील इमारतीच्या दक्षीण बाजूस गोसावी समाजाच्या दोन समाधी असून सदरील समाधीच्या बाजूस घराचे कंपाउंड बांधून समाधीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने भाविकांना समाधीचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण तत्काळ काढून भाविकांना रस्ता करून द्यावा.
परंडा भुईकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या मंडई पेठेतील रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण, जुनी भाजी मंडई रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून रस्ता रिकामा करावा. मंडई पेठेतील इमामबाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तेथुन रहदारीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. परंडा- बार्शी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ अतिक्रमण असल्याने समर्थ नगरकडे जाण्यास रस्ताच उपलब्ध नाही त्यामुळे हा रस्ता तत्काळ अतिक्रमण मुक्त करावा. अतिक्रमणे तत्काळ काढावीत जेणेकरून रहदारीस रस्ते उपलब्ध होतील. एक महिन्यात अतिक्रमण नाही काढल्यास शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा देण्यात आला आहे.