माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील गाजलेल्या ऑट्रॉसिटी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली असून, बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याला तब्बल ४० दिवसांनी अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांसमोर मुदेमालासह शरण आल्यानंतर न्यायालयाने त्याला धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, दि. ७ एप्रिल रोजी न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली होती. तेथेही दि. २९ एप्रिल रोजी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
दरम्यान, दि. २६ मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात रामचंद्र थिटे याच्याविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवसापासून आरोपी फरार होता.
या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सातत्याने केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तक्रारीनुसार, दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेजारील शेतातील आरोपी रामचंद्र थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक चोरमले, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट, बीट अमलदार विश्वास शिदे, राहुल गायकवाड व आडसुळ यांनी केला. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने सर्व स्तरांतून परंडा पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
