धाराशिव: (तानाजी घोडके) “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल,” या सरकारी घोषणेचा बोजवारा उडाला आहे. दिवाळी संपूनही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘फार्मर आयडी’ प्रलंबित असल्याच्या तांत्रिक गोंधळामुळे हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
या गंभीर प्रकारावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिवाळीपूर्वी न मिळाल्याने खासदार निंबाळकर यांनी आज आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले.
“सरकारने घोषणा करूनही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात का गेली? ‘फार्मर आयडी’चा हा तांत्रिक गोंधळ प्रशासनाला वेळेत का सोडवता आला नाही?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत, शासन यंत्रणेने तातडीने हा गोंधळ दुरुस्त करून पात्र शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरित करावे, अशी जोरदार मागणी या शिष्टमंडळाने केली.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक रुपया पोहोचेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा थेट इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे.