परंडा (ता. परंडा) – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत एका दिवसात १५ लक्ष वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा. मनीषा वडेपल्ली यांनी परंडा शहरात ५१ हजार झाडे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी लावण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमाला व्यापक जनसहभाग मिळावा, यासाठी दिनांक १५ जुलै रोजी बावची विद्यालय परंडा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती देत, शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, “एक व्यक्ती – एक झाड” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे यांनी विद्यालयाच्या वतीने मोहिमेस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. “शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहतील”, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ही मोहीम निसर्गरक्षण आणि हरित पर्यावरणाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरणार असून, हरित धाराशिव निर्माण करण्यासाठी सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे, हे या बैठकीतून अधोरेखित झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप आंबोले यांनी मानले .