मुंबई, दि. ३ ऑक्टोबर: राज्यभरातील लाखो एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गाडी नेमकी कुठे आहे, हे सहजपणे समजणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेल्या “आपली एसटी” या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या या ॲपसाठी तब्बल १२ हजारांहून अधिक बसेस आणि राज्यभरातील १ लाखाहून अधिक मार्गांचे मॅपिंग करण्यात आले आहे.
“आपली एसटी” ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:
- रिअल-टाइम ट्रॅकिंग: प्रवासी आता आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक किंवा सेवा क्रमांक टाकून बसचे थेट लोकेशन (लाईव्ह ट्रॅकिंग) पाहू शकतील.
- थांब्यांची अचूक माहिती: ॲपद्वारे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळेल. तसेच, बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) आणि स्थानकातून केव्हा सुटणार (STD) याची अचूक वेळ कळेल.
- वेळापत्रक आणि शोध: दोन थांब्यांदरम्यान धावणाऱ्या बसेसचे वेळापत्रक आणि जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे.
- सुरक्षेची काळजी: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देण्यात आली असून, एका क्लिकवर मदत मागवता येईल.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “लाखो प्रवासी या ॲपचा वापर करणार असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक त्रुटी येऊ शकतात. प्रवाशांनी त्या जरूर महामंडळाला कळवाव्यात, जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल.”
सध्या हे ॲप अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी “MSRTC commuter app” या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लवकरच त्याचे नाव बदलून “आपली एसटी” (Aapli ST) असे केले जाईल. भविष्यात हे लाईव्ह ट्रॅकिंगचे वैशिष्ट्य एसटीच्या मुख्य तिकीट बुकिंग ॲपमध्येही समाविष्ट करण्याची योजना असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या नव्या तंत्रज्ञानामुळे एसटीची सेवा अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.