कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव(प्रतिनिधी)कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले. त्यानंतर झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले असून, त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून उत्पादन खर्चात कपात होईल आणि उत्पन्नवाढीच्या दिशेने वाटचाल होईल. कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या यंत्रसामग्रीवरील करदर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, गवत कापणी यंत्र, पिक कापणी मशीन, कंपोस्टिंग मशीन यांवरील जीएसटी दर १२ टक्के वरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर ट्रॅक्टर पार्ट्सवरील करदर १८ टक्के वरून ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे दुरुस्ती व देखभाल खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. याबरोबरच सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. हातपंप, स्प्रिंकलर, ड्रिप सिंचन प्रणाली यांवर ५ टक्के करदर लागू करण्यात आला आहे. पाणी बचत, कमी खर्च आणि शाश्वत शेतीसाठी हे मोठे पाऊल आहे. यासह खते व कीटकनाशकांवरही मोठी सवलत देण्यात आली असून रासायनिक खते, जैविक कीटकनाशके यांवरील करदर आता ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पादन करता येईल. याशिवाय बायोगॅस प्लांट, सौर ऊर्जा उपकरणे, हातगाड्या मध्ये देखील करदर कपात करण्यात आली आहे. यामुळे शाश्वत व पर्यावरणपूरक साधनांचा वापर सुलभ होणार असून या सर्व सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नवाढीला चालना मिळणार असून भारतीय जनता पार्टी सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय हे शेतकरी-केंद्रित धोरणांचे स्पष्ट उदाहरण आहे, असे धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!