परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मधील दुसरा हप्ता प्रति मे. टन २०० रूपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे.
परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये १ लाख ३९ हजार ६२१ मे.टन ऊसाचे गाळप केलेले होते. गाळपास आलेल्या ऊसास पहिली उचल प्रती मे.टन २६०० रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली होती. चालू वर्षी भूम, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ‘देण्याचे दृष्टीकोनातून परंडा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसास दुसरा हप्ता प्रती मे.टन २०० रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
गाळप हंगाम २०२४-२५ चा एकुण भाव प्रती मे.टन २८०० रुपये झाला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या नियोजनाखाली जोमात चालू आहे. भैरवनाथ शुगरने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचा परिपक्क ऊस गाळपास पाठवून कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन अनिल सावंत यांनी केले.