भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग; बावनकुळे यांची मुंबईत भेट

माझं गांव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी)

बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.

या शिष्टमंडळाने सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाचा ठाम आग्रह धरला. ठाकूर यांचा दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक बांधणी आणि मतदारसंघातील प्रभाव लक्षात घेता, भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी त्यांची उमेदवारी महत्त्वाची असल्याचे नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील, धनंजय सावंत (जिल्हा परिषद सदस्य), दत्तात्रय कुलकर्णी (भाजप जिल्हाध्यक्ष), समरजितसिंह ठाकूर (उपनगराध्यक्ष, परंडा), अरविंद रगडे (तालुकाध्यक्ष, परंडा), गौतम लटके, जहीर चौधरी, उमाकांत गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या असून उमेदवारीबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुजितसिंह ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यास बीड, लातूर आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांत भाजपला मोठी राजकीय ताकद मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

आता भाजप पक्षश्रेष्ठी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!