“मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे भव्य प्रकाशन मराठी आत्मभान जागवणारे चिंतनशील लेखन : शुभम मुळे यांचे नवतेक पुस्तक रसिकांसमोर

पुणे(माझं गांव माझं शहर) दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात युवा लेखक शुभम मुळे यांच्या विचारप्रवर्तक “मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास साहित्य, सामाजिक आणि युवा क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष श्री. सुमेध गायकवाड, तसेच परिषदेचे अनेक पदाधिकारी, साहित्यिक आणि मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. शरद गोरे म्हणाले, “शुभम मुळे यांचे लेखन हे केवळ भावनिक नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर आरसा दाखवणारे आहे. ‘मराठ्यांचा मानसिक पराभव’ हे पुस्तक आजच्या तरुण पिढीला आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल. मराठी अस्मितेच्या लढ्यात विचारांची नवी क्रांती उभी करणारे हे पुस्तक आहे.”

लेखक शुभम मुळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हे पुस्तक लिहिताना माझा उद्देश कोणालाही दोष देणे नव्हता, तर आपण मराठी म्हणून आज कोणत्या मानसिकतेत जगतो, आपल्या पूर्वजांनी ज्या मूल्यांसाठी लढा दिला त्यापासून आपण किती दूर गेलो, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मराठ्यांचा मानसिक पराभव ओळखूनच आपण पुन्हा उभं राहू शकतो.” या पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासातील संघर्ष, आधुनिक मराठी समाजातील विचारांची ढासळलेली पायाभरणी, धर्म आणि राजकारणाच्या नावाखाली होत असलेली फूट, तसेच स्वाभिमान हरवलेला मराठी समाज या सगळ्यांचे तटस्थ आणि थेट विश्लेषण लेखकाने केले आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक युवकांना विचार करायला भाग पाडते आणि मराठी ओळख दृढ करण्याचा संदेश देते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम मुळे यांचे कौतुक करत त्यांना भावी लेखनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सुमेध गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन परिषद सदस्यांनी सुंदरपणे पार पाडले.

या प्रकाशन सोहळ्यामुळे संमेलनाला विशेष गती लाभली असून, “मराठ्यांचा मानसिक पराभव” हे पुस्तक आता मराठी वाचकवर्गात चर्चेचा विषय ठरत आहे.

error: Content is protected !!