परंडा | प्रतिनिधी
त्याग, बलीदान आणि बंधुभावाची परंपरा जपणारी बकरी ईद परंडा शहरात गुरुवारी (२८ मे) मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मौलाना जफर अली काझी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा केली. यावेळी देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
ईदच्या निमित्ताने पोलिस निरीक्षक असाराम चोरमले यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मौलाना जफर अली काझी, अॅड. नुरोद्दीन चौधरी, नगरसेवक ईस्माईल कुरेशी, नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, सत्तार पठाण, समीर पठाण, नाजीम मुजावर, जावेद पठाण, बाशा शहाबर्फीवाले, खेय्युम तुटके, अ. गनी हावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ईदची नमाज अदा केल्यानंतर शहरातील हजरत खाँजा बद्रोद्दीन दर्ग्यावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर एकमेकांना गळाभेट देत मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. बकरी ईद निमित्त संपूर्ण शहरात दिवसभर आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
