माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील सीना आणि उल्का नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तहसीलदार नीलेश काकडे यांच्या विशेष आदेशानंतर कपिलापुरी परिसरात धाड टाकून वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन अवाढव्य बोटी जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या. प्रशासनाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून सीना व उल्का नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. रात्री-अपरात्री होणारी वाहतूक, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने गोपनीय नियोजन करत विशेष मोहीम राबवली.
निवासी नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे पथक आणि सपोनि प्रवीण शिरसट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने कपिलापुरी परिसरात छापा टाकला. नदीपात्रात लपवून ठेवलेल्या वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन बोटी आढळून आल्या. या बोटी जागीच नष्ट करण्यात आल्याने अवैध वाळू माफियांना मोठा दणका बसला आहे.
या कारवाईत हवालदार शिवाजी राऊत, सचिन लेकुरवळे, कॉन्स्टेबल विशाल सगर, मंडळ अधिकारी डी. टी. पवार, आबासाहेब सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी महालिंगय्या स्वामी, तुकाराम वाळके, महेबूब आत्तार, आकाश वानखेडे, सुभाष शिंदे, उल्हास भोसले, किरण कोकाटे, विजय खोसे तसेच महसूल सेवक भरतेश चव्हाण, समाधान ढोरे, प्रशांत गवळी, सतीश कांबळे आणि भगवान गोमासे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रशासनाच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध वाळू उपशाविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.
