परंडा (तानाजी घोडके )परंडा आणि भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने हाहाकार माजवला असून, शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत आपले प्राण धोक्यात घालून दिवस-रात्र बचावकार्य राबवले. या धाडसी मोहिमेत पाण्याच्या कचाट्यात अडकलेल्या ३०० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
महापुराच्या पाण्याने वेढलेल्या गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव पथके देवदूत ठरली. घरदार सोडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर सुटकेनंतर दिसणारी स्मितरेषा अत्यंत दिलासादायक होती. अनेक लेकरं आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित पोहोचली, तर वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. हे सर्व दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करत सुटका झालेल्या नागरिकांसाठी जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक सुविधांची सोय केली आहे.
या गावांना मिळाले जीवदान या बचाव मोहिमेत प्रामुख्याने वाघेगव्हाण (१७३), देवगाव (२६), नालगाव (१९), रुई (१३), लाखी (१२), मुंगशी (१२), कपिलापुरी (९), ढगपिंपरी (८), ईडा (७), तांबेवाडी (६), उळूप (६), वडनेर (४), कारंजा (२), इट (१), जांब (१) आणि रामेश्वर (१) या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
या कठीण परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी झटणाऱ्या सर्व जवान, अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्याला सलाम केला जात आहे. या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.