अखेर सहशिक्षक पी. एम. मोहोळकर निलंबित..

परंडा, (प्रतिनिधी)दि. ३- तालुक्यातील चिंचपूर बु. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे सहशिक्षक पी. एम. मोहोळकर हे वारंवार मद्यप्राशन करून शाळेत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मोहळकर हे २८ जून रोजी मद्यप्राशन करून शाळेत आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांचा मद्यप्राशन करून पालकांशी उद्धट उत्तर देणारा व्हिडिओ देखील चित्रित करून माज माध्यमावर व्हायरल केला होता. मोहळकर हे दारूच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे ते अनेकवेळा शाळेच्या वेळेत दारू प्राशन करून येत होते. दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर जात होते. त्यामुळे विद्यार्थी भयभीत होत होते. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी शाळेत येऊन अनेकवेळा मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी आणि सदस्याने देखील हा विषय उचलून धरला होता. मात्र, अनेकवेळा त्यांना पाठीशी घालण्यात आले. यापूर्वी गेल्यावर्षी जुलै महिन्यात केंद्रप्रमुख संतोष देवकर यांनी मोहळकर हे शाळेत दारू पिऊन येत असल्याबाबत आपल्या अहवालात नोंद केली होती. तरी देखील त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शाळा भरल्यानंतर मोहोळकर हे दारू पिऊन आल्याचे दिसताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक कार्यालयात त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांना पंचनामा करावयास लावून प्रशासनाला कळवायला सांगितले. मोहळकर यांचा शाळेत दारूच्या नशेत वेळोवेळी वाकडे उत्तर देतानाचा व्हिडिओ चित्रित करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला. त्यामुळे शिक्षण विभागावर सगळीकडून टीकेची झोड सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावी लागली.

पालकांचा दबाव निर्माण झाल्यावर केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने मोहळकर यांच्यावरील कारवाईचा अहवाल जिल्हा स्तरावर पाठवला. त्यानंतर विभागाचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांनी मोहोळकर यांच्या निलंबाचा आदेश काढला. त्यामुळे व्यसन करणाऱ्या शिक्षकांना चांगला चाप बसणार आहे. प्राथमिक जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांचा बिअर बार परमिट रूममधील नियमित उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना घडविणारे भावी पिढीला आकार देणारे जर व्यसनाधिन असतील तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कसे होतील, असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!