धाराशिव येथील शेतकरी आंदोलन चिघळले; जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंदोलक उपोषणावर ठाम

धाराशिव: येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळले आहे. आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसून, आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलक अमोल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमोल जाधव आणि त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी शनिवारी झाडावर चढून आंदोलन केले होते, तसेच आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत सुरू असलेला शासकीय कार्यक्रमही उधळून लावला होता.

या पार्श्वभूमीवर, आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा पाटील यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक अमोल जाधव यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आंदोलकांच्या मागण्या समजावून घेतल्या आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका अमोल जाधव आणि इतर आंदोलकांनी घेतली.

जवळपास अर्धातास चाललेल्या या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जात असून, प्रत्यक्ष कार्यवाही केली जात नसल्याने आंदोलक संतप्त आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी आणि आमदारांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलक आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या गांभीर्याने घेऊन त्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

error: Content is protected !!