परंडा(माझं गांव माझं शहर) मुस्लीम धर्माचे संस्थापक महमंद पैगंबर यांची जयंती ‘ईद ए मिलाद’ शहरात मोठ्या श्रद्धेने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून सकाळी ९ वाजता मुख्य मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान जागोजागी लहान मुलांसाठी शरबत व खाऊचे वाटप करण्यात आले.
सकाळी परंडा येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या जामे मशीद येथे मौलाना यांनी पैगंबर जीवनावर प्रवचन केले. जगामध्ये शांतता, संमृद्धी, सुख निर्माण व्हावे यासाठी महमंद पैगंबरांचे विचार कसे आवश्यक आहेत यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवचन संपल्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास पैगंबर यांच्या विचाराचा प्रसार करणारे संदेश स्पीकरवर लावून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ म्हणजेच मिरवणुक काढण्यात आली. मिरवणूक मंडई पेठ, महात्मा फुले चौक, भीम नगर, मंगळवार पेठ, नालसहाब गल्ली, शिकलकर गल्ली, टिपू सुलतान चौक मार्गे आठवडा बाजार मंडई पेठ, जुनी अडत लाईन, कुरेशी गल्ली मार्गे परंडा शहराचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा बद्रुद्दीन दर्गा स्थळी पोहोचली. लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. ‘नार-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ ‘नार-ए-रिसालत, या रसुलुल्लाह’ अशा घोषणांसह तरुणांनी आणि लहान मुलांनी इस्लाम धर्माचा झेंडा फिरवत पैगंबराबद्दल आदर व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता दर्गा या ठिकाणी फातेयखानी करुन महाप्रसादाने झाली. दर्गाहस्थळी जुलूस कमिटीच्या वतीने परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पो. कॉ. नितीन गुंडाळे यांचा सत्कार करण्यात आला. ईद-ए-मिलाद निमित्त पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुलूस मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. ईद-ए-मिलाद निमित्त परंडा शहराच्या विविध भागात पताके झेंड्यांसह विद्युत रोशनाई करण्यात आली होती. ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी जुलूस कमेटीचे अध्यक्ष हाफीज निजाम, हाफिज गुलाम गौस, मौलाना जफरअली काझी, हाफीज मुस्तफा आदिंनी परिश्रम घेतले.